शेवगाव : तालुक्यातील ७९ गावांची रब्बी हंगाम पिक नजर आणेवारी पन्नास पैशाच्या पुढे लावण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटामुळे होरपळून निघालेल्या तालुक्यात महसूल विभागाच्या कारभारावर शेतक-यातून नाराजी व संतापाचा सूर व्यक्त होत आहे.अत्यल्प पावसामुळे शेवगाव तालुक्यात खरीपा पाठोपाठ रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, व पाणी आदी मुलभूत समस्यांची तीव्रता हिवाळ्यातच वाढत चालल्याने संकटाच्या मुकाबल्यासाठी शासनाच्या पातळीवरून अत्यावश्यक उपाययोजना आखून शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी सुरु आहे. तालुक्यातील २३ गावे व ५२ वाड्यावस्त्यांना २५ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. चारा टंचाईच्या संकटाने पशुधन वाचविण्याची गंभीर समस्या शेतक-यांपुढे निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर करून पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत मागील महिन्यात पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत अत्यावश्यक उपाययोजना आखण्याच्या सूचना संबधित यंत्रणेस देण्यात आल्या आहेत. या सर्व पाश्वभूमीवर रब्बी हंगामाची नजर आणेवारी पन्नास पैशा पेक्षा जास्त जाहीर करून प्रशासनाने शेतक-यांची चेष्टा चालविल्याचा रोखठोक आरोप शेतक-यातून होत आहे. जाहीर केलेल्या नजर आणेवारीचा फेर विचार करून शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर शेतक-यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून संबधित विभाग व अधिका-यांना जाब विचारणारे आंदोलन पुकारण्याचा निर्धार शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.पिक नजर आणेवारीचे गावे -बालमटाकळी, चापडगाव, आपेगाव, गरडवाडी, गायकवाड जळगाव, लखमापुरी, मळेगाव, निंबे, सोनविहीर, शहापूर, ठाकूरपिंपळगाव(५२ पैसे), आखतवाडे, ब-हाणपूर, नांदूर विहीरे, वडुले बु, वडुले खु(५३ पैसे), अंतरवाली खु, गदेवाडी, खडके, कांबी, कुरुडगाव, लाखेफळ, मलकापूर, तळणी, वाघोली, रावतळे(५४ पैसे), आव्हाणे बु, आव्हाणे खु, बक्तरपूर, दहीगाव शे, घोटण, हातगाव, खामपिंपरी, मडके, मुंगी, प्रभूवडगाव, पिंगेवाडी, सामनगाव, (५५ पैसे), भायगाव(५६ पैसे), देवटाकळी(५७ पैसे), डोंगर आखेगाव, मुर्शतपूर (५८ पैसे), भातकुडगाव, खरडगाव (५९ पैसे), ढोरजळगाव शे, ढोरजळगाव ने, शेवगाव (६०), आखेगाव तीतर्फा, दादेगाव, शहाजापूर, वरूर बु (६१ पैसे), अमरापूर, बोडखे, जोहारापूर, खुंटेफळ, सुलतानपूर खु , सुलतानपूर बु, ताजनापूर(६२ पैसे), हिंगणगाव ने, खानापूर, क-हेटाकळी, खामगाव, वरूर खु, (६४पैसे), भगूर, मजलेशहर, विजयपूर, (६५ पैसे), भाविनिमगाव(६६ पैसे), अंत्रे, दहिफळ, ढोरहिंगणी, ढोरसडे, शहरटाकळी, रांजणी, कर्जत खु(६७ पैसे), दहीगाव ने, एरंडगाव, घेवरी, लाखेफळ, देवळाने (६८ पैसे).