अहमदनगर: जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींसाठी ८२. ७३ टक्के मतदान झाले असून, सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यात ८७ टक्के मतदान झाले आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायतीसाठी ११ लाख ६७ हजार २५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७१ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावत मतदान केले. किरकोळ वादावादी वगळता मतदान शांतेत पार पडले. मतदान केंद्र परिसरात कार्यकऱ्यांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी काही गावांमध्ये पोलिसांकडून बळाचा वापर केेला गेला. दोन गटांत वाद झाल्याने मतदान काही काळ थांबविल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. वाद निवळल्यानंतर मतदान पुन्हा सुरू करण्यात आले.
ग्रामपंचायतीसाठी मतदारांमध्ये सकाळपासून उत्साह होता. गावापासून दूर वाड्या वस्त्यांवर असलेल्या मतदारांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यामुळे मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडले होते. सकाळी पुरुष मतदारांची संख्या मतदान केंद्रांवर अधिक होती. दुपारनंतर घरकाम संपून महिला मतदानासाठी बाहेर पडल्या. शेवगाव तालुक्यातील घोटण येथे सयंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार सलमा सय्यद यांनी मतदारांना मर्जीप्रमाणे मतदान करू दिले नाही, असा आरोप करत फेर मतदान घ्यावे, अशी मागणी केंद्र प्रमुखांकडे करण्यात आली. तसेच न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा देण्यात आला. जामखेड तालुक्यातील नायगाव डोंणगाव येथे सकाळी मतदान सुरू होताच मतदान यंत्रणात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे काही काळ मतदान ठप्प होते.
...
शेतीकामाला एक दिवस स्वयंघोषित सुट्टी
सध्या सर्वत्र शेतीची जोरात कामे सुरू आहेत; परंतु गावातील मतदान असल्याने शेती कामाला एक दिवस सुटी देण्यात आली. शेतीची कामे बंद ठेवून मतदारांनी उत्साहात मतदान केले. त्यात मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा असल्याने मतदानासाठी वेळ लागला.
...
अनेक मतदारांकडे एकही पुरावा नाही
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २१ पुरावे ग्राह्य धरले जातात; मात्र अनेक मतदारांकडे एकही पुरावा नव्हता. त्यामुळे त्यांना मतदान करू दिले नाही. यावरून काही गावांत केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले.
...
मास्क सोशल डिस्टन्सिंगला फाटा
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी धोका कायम आहे. त्यामुळे शासनाने मतदान केंद्रांवर मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, याबाबतचे आदेश दिले होते; परंतु मतदान केंद्रांवर विना मास्क मतदार मतदानासाठी येत होते. मतदान कक्षातही मतदारांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली, तसेच मतदान केंद्राबाहेरही कमालीची गर्दी होती. त्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
...
प्रशासकीय यंत्रणेकडून पुरुष मतदारांना प्राधान्य
मतदान केंद्रावर गोंधळ होऊ नये, यासाठी पुरुष मतदारांना मतदान करून बाहेर काढले जात होते. तोपर्यंत महिला मतदारांना थांबविण्यास सांगितले जात होते. महिला रांगेत येऊन थांबत होत्या; परंतु त्यांना मतदान कक्षात सोडले जात नव्हते. त्यामुळे महिलांना तासंतास उभे राहावे लागत होते.
...
...