पाथर्डी : ग्रामपंचायत निवडणुकीत ७५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यात सरारसरी ८२ टक्के मतदान झाले.
मतदानाची टक्केवारी जमा करताना काही गावात संपर्क होत नसल्याने अडचणी येत होत्या. एकनाथवाडी येथे किरकोळ वाद झाला मात्र तो गावातच मिटविण्यात आला. तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. सकाळी अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. दिवसभर शेतीच्या कामाला जाणाऱ्या महिला व पुरुष सकाळी ८ वाजल्यापासून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत होते.
अकोला, कासारपिंपळगाव, माणिकदौंडी, लोहसर, मिरी, पिंपळगाव टप्पा, येळी, खरवंडी, दैत्यनांदुर, सुसरे, माळीबाभुळगाव, शिरसाटवाडी या गावात मतदानासाठी उत्साह जाणवत होता.
तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासह महसूल
पंचायत समिती, आरोग्य विभाग, पोलीस यांनी मतदार सुरळीत होण्यासाठी संघटितपणे काम केले.
माजी आमदार आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, शिवशंकर राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव शिरसाट यांनी त्यांच्या गावात मतदानाचा हक्क बजावला. कामत शिंगवे गावात मतदान करताना मतपत्रिकेवर
काहीतरी खून केल्याची तक्रार काही लोकांनी केली होती. फिरत्या पथकातील अधिकाऱ्यांनी जाऊन तेथील अधिकारी व कर्मचारी यांना समज दिली. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने मतदान शांततेत पार पडले.