अहमदनगर : जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ११८५ गावांसाठी ८४ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या टंचाई कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे. यात सर्वाधिक ८० कोटींची तरतूद टँकरसाठी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ॲाक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत पाणीटंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांचा संभाव्य कृती आराखडा तयार करून अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. काल (सोमवारी) जिल्हाधिकाऱ्यांनी या आराखड्यास मंजुरी दिली. चालू वर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत कमी पाऊस झाला. पहिले दोन महिने तर पावसाने ओढ दिली होती. सप्टेंबरअखेर झालेल्या पावसाने काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली. जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी ४४८ मिलिमीटर असताना यंदा केवळ ४०० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. म्हणजे १६ टक्के पावसाची तूट आहे. अजून हिवाळाच सुरू असतानाही जिल्ह्यात ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणखी तीव्र होईल, या अंदाजाने हा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. हा सर्व निधी नैसर्गिक आपत्ती अनुदानातून खर्च होणार आहे. आराखड्यात यावर होणार खर्च
२९ गावांत आणि १६६ वाड्या-वस्त्यांवर नळयोजना प्रगतिपथावर आहेत. त्या पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. शिवाय अस्तित्वातील एका नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी दोन लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. १२ गावे आणि २ वाड्या अशा १४ ठिकाणी नवीन विहिरींसाठी ५.३१ लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. विहिरी खोल करण्यासाठी २ गावांत ४ लाखांचा खर्च प्रस्तावित आहे. टंचाई निवारणाची मोठी भिस्त खासगी विहिरींवर असल्याने १८८ गावे व ११३ वाड्यावर खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एक कोटी ६९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. टँकरसाठी विशेष निधी
पावसाचे प्रमाण कसेही असले तरी जिल्ह्याच्या ठरावीक भागात उन्हाळ्यात टँकर सुरूच करावे लागतात. तीव्र दुष्काळ असेल तर टँकरची संख्या ५००च्या पुढे जाते. या उन्हाळ्यात ८९७ गावे व ३५५० वाड्यांसाठी टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यासाठी आराखड्यात सर्वाधिक ८० कोटी ९४ लाख खर्च गृहीत धरला गेला आहे. याशिवाय टँकर भरण्यासाठी वेगळ्या एक कोटी ६९ लाखांच्या निधीची तरतूद आहे.