- शेखर पानसरेलोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त येथील छत्रपती फाउंडेशन संचलित शिवजयंती उत्सव युवक समितीच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा रविवारी (दि. ०५) आयोजित रक्तदान शिबिरात ९१२ दात्यांनी रक्तदान केले. शहर आणि तालुक्यात नऊ ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
उत्सव समितीचे काेअर कमिटी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी देखील शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. यंदा शुक्रवारी (दि. १०) तिथीनुसार ३९३ वी शिवजयंती साजरी होणार आहे. १२ वर्षांपूर्वी युवकांनी एकत्र येत शिवजयंती उत्सव युवक समितीची स्थापना केली. त्यामाध्यमातून दरवर्षी शिवजयंती सप्ताहात विविध उपक्रम राबविले जातात.२०२१ मध्ये आयोजीत रक्तदान शिबिरात ८१२ तर २०२२ मध्ये १०३७ दात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला होता.
माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सीए. सोपानराव देशमुख, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, कर्करोग तज्ञ डॉ. जयश्री थोरात, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक निवांत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे) मुजीब शेख, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीष कानवडे, राम जाजू, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मिलिंद कानवडे, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, जयवंत पवार, किशोर टोकसे, किशोर कालडा, हिरालाल पगडाल, संजय कबाडे आदींनी शिबिराच्या ठिकाणी भेट देत उपक्रमाचे कौतूक केले.
९ ठिकाणी रक्तदान शिबीरसोमेश्वर मंदिर परिसर (रंगारगल्ली), बालाजी मंदिर (पद्मनगर), संगमनेर बसस्थानक परिसर, तिरंगा चौक, निमगाव भोजापूर, पेमगिरी, सुकेवाडी, करूले, तळेगाव दिघे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातही ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. तसेच मुली-महिलांनी देखील रक्तदानाचा हक्क बजावला.