रोहित टेके / प्रमोद आहेर
शिर्डी - दुध भेसळ मोठ्या प्रमाणात होत असून ती रोखण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे आहे. त्यामुळे दुध भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा सरकार करणार आहे. श्रीगोंद्यात दोन दिवसापूर्वी दुध भेसळीबाबत कारवाई केली. तेव्हापासून साठ हजार लिटर दुध घटले. भेसळीचे दुध खरेदी करण्यात व अशा भेसळीला प्रोत्साहन देणाऱ्या एका मोठ्या दुध संघाचे नाव आले आहे. त्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. शासन सेद्रीय शेतीला प्राधान्य देत आहे, मात्र पशुधनाशिवाय सेंद्रीय शेती नाही. लंपी आजाराचे संपुर्ण जनावरांना लसीकरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. लंपीने ३६ हजार जनावरे दगावली. त्या पशुपालकाना ९४ कोटीची मदत केली. असा निर्णय घेणारेही महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. गोपालन, कुक्कुटपालन, शेळी-मेढीपालन हे शेतीसाठी अधिक फायदेशीर असल्याने या पुरक व्यवसायाला अधिक चालना देण्याचे सरकार काम करणार आहे. राज्यातील ७० हजार शेतकरी कुक्कुटपालन करत आहेत. मात्र कंपन्या शेतकऱ्याची फसवणूक करत असल्याने त्याबाबत शेतकरयाना न्याय देण्यासाठी समिती केली. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची आता गय केली जाणार नाही. कुक्कुटपालन वाढीसाठी बीजव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. तशी तरतूद देखील अर्थसंकल्पात केली आहे. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई पंधरा दिवसात देणार असल्याची घोषणा केली.
शिर्डी (ता. राहाता) येथे होत असलेल्या राज्यस्तरीय पशुप्रदर्शन महापशुधन एक्स्पो 2023) ला आज (शुक्रवारी) महसुल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी अब्दुल सत्तार होते. यावेळी खासदार सुजय विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, माजीमंत्री अण्णासाहेब मस्के, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. पी. जी. पाटील, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, पुणे जिल्हा दुध संघाच्या अध्यक्ष केशरताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.