संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात बुधवारी (दि.२८) रात्री अकरा वाजेच्या सुमारास एका कारने अचानक पेट घेतला. यात कार पूर्णपणे जळून खाक झाली. या कारमधून गोमांस वाहतूक होत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केला आहे.
कार पेटल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळविण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला. या कारमधून प्रवास करणारे प्रवासी, कारचालक हे कोण होते याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
संगमनेर शहरातील मदिना नगर, जमजम कॉलनी, भारत नगर, हावडा ब्रिज, मोगलपुरा, जोर्वे रस्ता, कोल्हेवाडी रस्ता येथे गोवंश जनावरांची कत्तल केली जाते. वाहनांमध्ये गोमांस भरून ते विक्रीसाठी मुंबईला नेण्यात येते. संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांवर पोलीस कुठलीही ठोस कारवाई करत नाही. असाही आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केला आहे.