कोपरगाव (जि. अहमदनगर) : शहरातील एका मुलीवर झालेल्या अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ २० जुलै रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी झालेल्या सभेत दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याप्रकरणी सुदर्शन वृत्तवाहिनीचे सुरेश चव्हाणके व सागर बेग यांच्याविरुद्ध यांच्याविरुद्ध शनिवारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोपरगाव शहरात एका मुलीवर अत्याचार व तिचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने २० जुलै रोजी जन आक्रोश मोर्चा काढला होता. मोर्चा संपल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत सागर बेग (रा. श्रीरामपूर) व सुदर्शन वृत्तवाहिनीचे संचालक सुरेश चव्हाणके (रा. दिल्ली) यांनी जातीय दंगल होईल अशी चिंतावणीखोर भाषणे केली. त्यामुळे दोन समाजात तेड निर्माण झाली. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाले, अशा आशयाची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल राम खरतोडे यांनी शनिवारी कोपरगाव पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून चव्हाणके व बेग यांच्याविरुद्ध भांदवा १५३(अ), व २९५, ५०५, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहे.
... तरीही लढत राहणार
कोपरगावमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश चव्हाणके यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत त्यांनी, यापूर्वी १८२७ गुन्हे दाखल आहेत. दोन लाख गुन्हे दाखल झाले तरी मी लढत राहणार असे सांगून घाबरायचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वाण आम्ही घेतलेले आहे. यापुढे हिंदुत्वासाठी लढत राहणार, अशी भुमिका स्पष्ट केली.