संगमनेर : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्याकडे पैशांची मागणी करत १७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या संगमनेर नगर परिषदेतील कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. ३) संध्याकाळी शहरातील मोगलपुरा परिसरात ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विकास जोंधळे (वय २८) असे या अभियंत्याचे नाव आहे. तो संगमनेर नगर परिषदेत पंतप्रधान आवास योजनेचे काम पाहत असताना लाभार्थ्याला पहिल्या मंजूर धनादेशासाठी त्याने पैशांची मागणी केली होती. त्यानंतर लाभार्थ्याने त्या संदर्भात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस हेड कॉस्टेबल पंकज पळशीकर, पोलीस नाईक नितीन कराड, पोलीस नाईक प्रकाश महाजन, चालक पोलिस नाईक परशुराम जाधव यांनी १७ हजार रुपयांची लाच स्वीकारणारा कंत्राटी अभियंता जोंधळे याला पकडले.