शेखर पानसरे, संगमनेर : कोल्हार-घोटी राज्यमार्गावर संगमनेरातील चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये बिबट्या घुसला होता. शनिवारी (दि.०८) सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षकाने शोरूममध्ये बिबट्या पाहिला. तसेच शोरूममधील सीसीटीव्हीमध्ये सुद्धा बिबट्या कैद झाला आहे.
संगमनेर पंचायत समितीच्या पुढे काही अंतरावर शिरोडे ह्युंदाई या कंपनीचे चारचाकी वाहनांचे शोरूम आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास तेथील सुरक्षारक्षक चारचाकी वाहने उभी करण्यासाठी पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेकडे जात होता. त्यावेळी त्याने तेथे बिबट्या पहिला. त्याने याबाबत शोरूम संचालक व्यवस्थापक वैभव येवला यांना फोन करून सांगितले. येवला हे शोरूममध्ये पोहोचले. त्यांनी शोरूममध्ये बिबट्या असल्याचे वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी तेथे पोहोचले. परंतू तोपर्यंत बिबट्या आठ-दहा फूट उंचीचे सुरक्षा भिंतीवरून उडी मारून पाठीमागे असलेल्या शेतात निघून गेला हाेता. बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्या जेरबंद होण्यासाठी वनविभागाने परिसरात पिंजरा लावला, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.