संगमनेर : मुलीचे लग्न झाल्यानंतर गर्भधारणा होऊन तिची घरीच प्रसूती झाली. त्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागल्याने तिला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाणवल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री झाल्याने या प्रकरणी गुरुवारी (दि.०४) संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सतरा वर्षीय पिडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा नवरा, तिचे आई-वडिल, सासू-सासरा अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलीचे माहेर आणि सासर हे दोन्हीही संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहे. २५ जानेवारी २०२२ ला अल्पवयीन मुलीचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी तिला गर्भधारणा झाली, तिची घरीच प्रसूती झाली. मात्र, तिच्या पोटात दुखायला लागल्याने तिला उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ही मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले. मुलीचा नवरा, तिचे आई-वडिल, सासू-सासरा यांनी संगनमत केले, लग्नाचे वय नसताना देखील तिचे लग्न लावून दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय खंडीझोड अधिक तपास करीत आहेत.