कोपरगाव (जि. अहमदनगर): तालुक्यातील रवंदा येथून संभाजीनगर जिल्हातील खुलताबादकडे जात असलेली भरधाव पिकअपवरील चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगावमळे हद्दीततील जुन्या मुंबई - नागपूर महामार्गावर गुरुवारी (दि. ४) घडली.
या घटनेत चालकासह गाडीतील आठ जण जखमी झाले आहे. तळेगावमळे परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावल्याने वेळेवर सगळ्यांना विहिरीबाहेर काढून उपचारार्थ वैजापूर व कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी ग्रामस्थ व क्रेनच्या सहायाने पिकअपसह वाहनातील लोकांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात अनिल पवार, आकाश पवार, कृष्णा पवार, रवी पवार, विकी पवार यांच्यासह इतर तीन जखमीवर उपचार सुरू आहे.