शेखर पानसरे
संगमनेर : वाळूची अवैधरित्या वाहतूक होत असलेली विना क्रमाकांची पीकअप महसूल विभागाने कारवाईत जप्त केली होती. संगमनेर शहरातील जुन्या पोलिस वसाहतीमध्ये उभी असलेली ही पीकअप दोघांनी चोरून नेली. या प्रकरणी त्यांच्याविरोधात सोमवारी (दि. २७) रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोहन बारकू भोकनळ, शिवाजी राधाकिसन घुले (दोघेही रा. मंगळापूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात बाबाजी किसन जेडगुले (मंडलाधिकारी, संगमनेर बुद्रूक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. २५ ऑक्टोबर सकाळी ७. ३० ते २७ नोव्हेंबर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पीकअप चोरीची घटना शहरातील जुन्या पोलिस वसाहतीमध्ये घडली आहे. वाळूची अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या विना क्रमाकांच्या पीकअपवर महसूल विभागाने कारवाई केली होती, त्यात एक ब्रास वाळू होती. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक टोपे अधिक तपास करीत आहेत.