लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून आमदार संग्राम जगताप व रोहित पवार यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. आमदार पवार यांनी अहिल्यानगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत राजकारण झाल्याची टीका केली होती. त्यावर हा काय बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही, अशा शब्दात आमदार जगताप यांनी पवार यांच्या टीकेला मंगळवारी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे कुस्तीच्या आखाड्यावरून जगताप व पवार यांच्यात राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच अहिल्यानगरमध्ये पार पडली. अंतिम निकालावरून स्पर्धा वादग्रस्त ठरली. मल्लांपुरती मर्यादित असलेल्या या कुस्ती स्पर्धेत राजकीय नेत्यांनीही उडी घेतली. आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे जाहीर करत वेगळाच डाव टाकला. या स्पर्धेची घोषणा त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, अहिल्यानगरमध्ये यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. पण, त्यात राजकारण झाले. आम्ही मात्र तसे करणार नाही. राजकारण विरहित कुस्ती स्पर्धा घेऊ. पवार यांनी केलेली टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांनी रोहित पवार यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांना चार दिवस कुस्ती पाहायला वेळ मिळाला नाही.
आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकारण झाल्याचे बोलत आहेत. त्यांच्याविरोधात निवडणूक लढविलेले आमदार राम शिंदे हे सभापती झाले. जिल्ह्याचा आमदार एखाद्या सभागृहाचा सभापती झाला तर त्याचा अभिमान असलाच पाहिजे. सभापती राम शिंदे कुस्तीस्पर्धेला उपस्थित होते. कार्यक्रमाला निमंत्रित देण्याचा अधिकार आयोजकांना आहे. जनतेत काम करणारा लोकप्रतिनिधी असल्याने जनतेतील व्यक्तींना तिथे बोलावले होते. रामदास तडस यांनी सांगितले आहे की, ती स्पर्धा अधिकृत नाही. त्यामुळे त्यावर जास्त भाष्य नको, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
जगताप, पवारांत आता राजकीय कुस्ती
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना आमदार संग्राम जगताप व रोहित पवार एकाच पक्षात होते. परंतु, त्यांच्यात फारसे सख्य नव्हते. पक्षात फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देणारे संग्राम जगताप हे जिल्ह्यातील पहिले आमदार आहेत. यापूर्वी जगताप व पवार यांच्यात थेट सामना रंगल्याचे ऐकिवात नाही. मात्र महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीवरून पवार यांनी जगताप यांच्यावर निशाणा साधला. त्याला जगताप यांनीही पवार यांचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे भविष्यात हा वाद आणखी रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे.