प्रशांत शिंदे
अहमदनगर- जामखेड तालुक्यातील एका शिक्षकाच्या मुलाने महागडा फोन घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गजानन रामदास उगले (वय २३) रा. नायगाव असे या तरुणाचे नाव आहे.
गजानन याने २३ दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु डॉक्टरांना त्याला वाचवण्यात अपयश आले. या घटनेमुळे जामखेड परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, मयत गजानन उगले याचे वडील खर्डा येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २३ दिवसांपूर्वी (२८ एप्रिल) गजाननने वडिलांकडे महागडा फोन घेण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागातून त्याने विषारी औषध प्राशन केले होते. यानंतर त्याला जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती. दोन दिवसांनंतर त्याला घरी सोडण्यात येणार होते. मात्र शनिवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.