लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: शहरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे सीना नदीला आलेल्या मोठ्या पुरात कल्याण रोडवरील पुलावरून तरुण वाहून गेला. महापालिका आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, पोलीस, तसेच स्थानिक नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. विशाल देवतरसे (वय ३५, रा. कुंभारगल्ली) असे वाहून गेलेल्या या तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हा तरुण कल्याण रोडवरून नगरच्या दिशेने येत होता. परंतु दिवसभर पडलेल्या पावसाने सीना नदीला मोठा पूर आला. कल्याण रोडवरील अमरधामजवळील पूल पाण्याखाली गेल्याने सकाळपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद होती. दुपारी पाऊस थांबला, मात्र नदीला प्रचंड पाणी असल्याने दोन्ही बाजूचे प्रवासी पुलापर्यंत येऊन मागे फिरत होते. अशातच सायंकाळी सहाच्या दरम्यान विशाल देवतरसे हा तरुण पुलावरून चालत अमरधामच्या दिशेने येत होता. तेथे उपस्थित लोक त्याला थांबण्याचा इशारा करत होते. मात्र, तो पुलावरून जात असतानाच वाहून गेला.
घडलेल्या प्रकारानंतर साडे सहाच्या दरम्यान महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला ही माहिती समजताच पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी या तरुणाची शोधमोहीम सुरू केली. पोलीसही दाखल झाले. पोलीस, स्थानिक रहिवासी व मनपा पथकाने काटवन खंडोबा पुलापर्यंत या तरुणाचा शोध घेतला. परंतु तो सापडला नसल्याची माहिती शंकर मिसाळ यांनी दिली. अंधारामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याने रात्री नऊ वाजता मदतकार्य थांबवण्यात आले. शुक्रवारी सकाळी पुन्हा या तरुणाचा शोध घेतला जाणार आहे.