अहमदनगर : तीस ते चाळीस हजार रुपयांचा हॉयमॅक्स दिवा श्रीगोंदा नगरपालिकेत ९० हजारांवर कसा पोहोचला? हा प्रश्न निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात कळीचा बनला आहे. विद्यमान नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी याबाबत बबनराव पाचपुते यांना तर पाचपुते गटाने पोटे यांना जबाबदार धरले आहे. तिस-या आघाडीचे नेतृत्व करणा-या संभाजी ब्रिगेडने हा मुद्दा मतदारांपर्यंत पोहोचवत दोन्ही पक्षांना या भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला आहे.श्रीगोंदा शहरात ३३ कोटी रुपये खर्चाची १७ रस्त्यांची कामे सुरु आहेत. या रस्त्यांमध्ये हायमॅक्स बसविण्यासाठी तब्बल साडेपाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र हायमॅक्सचा पोल व त्यावरील दोन दिवे यासाठी तब्बल ९० हजारांचा खर्च दाखविण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केला आहे.टिळक भोस यांनी सभा व सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत भाजप व कॉंग्रेस आघाडीवर हल्ला चढविला आहे. ‘हायमॅक्समध्ये भ्रष्टाचार केलेला नाही’, अशी शपथ सत्ताधारी व विरोधकांनी पीर मोहम्मद महाराज यांच्या दर्ग्यावर घ्यावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे. आमचा नगराध्यक्ष निवडून आल्यास पहिल्याच सभेत या कामांची चौकशी लावणार, अशीही घोषणा त्यांनी केली आहे.‘लोकमत’ने या मुद्दाकडे पोटे यांचे लक्ष वेधले असता ‘मी फक्त बिलावर स्वाक्षरी केली. सर्व निर्णय काष्टीतून झाले’, असे सांगत बबनराव पाचपुते यांच्याकडे बोट दाखविले आहे. तर भाजपच्या उमेदवार सुनीता शिंदे यांनी ‘पोटे यांनीच पालिकेत गडबडी केल्या’, असा आरोप केला आहे. दोन्ही आघाड्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवत या कामात अनियमितता असल्याचे एकप्रकारे मान्य केल्याने हा मुद्दा अखेरच्या टप्प्यात चर्चेचा ठरला आहे.भाजपच्या प्रचारासाठी गिरीश महाजन तर कॉंग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी अजित पवार शुक्रवारी श्रीगोंद्यात येत आहेत. हे नेते हायमॅक्स, रस्त्यांची कामे व शहरातील अस्वच्छता याबाबत काय बोलणार? याची उत्सुकता आहे. तिसºया आघाडीसाठी टिपू सूलतान यांचे वंशज शहजादे सय्यद मन्सूर अलिशाह टिपू यांची सभा श्रीगोंद्यात होत आहे. तिस-या आघाडीने मुस्लीम चेहरा मैदानात उतरवून जातीय समीकरणे बदलवली आहेत.
तिस-या आघाडीवर समीकरणे
श्रीगोंद्यात नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या सुनीता शिंदे, कॉंग्रेस आघाडीच्या शुभांगी पोटे, तर तिसºया आघाडीमार्फत सिराबजी कुरेशी मैदानात आहेत. तिसºया आघाडीने दोन्ही प्रस्थापित पक्षांना लक्ष्य केले असल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. मात्तबर नेत्यांच्या लढतीत तिसºया आघाडीनेही आपल्याकडे लक्ष वेधले आहे. निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, तरीही मतदार काय करतील याची धास्ती प्रस्थापित नेत्यांना आहे.