कोतूळ : अकोलेतील दुर्गम फोपसंडी गावातील तुषार मुठेची मोरीतील शाळा ‘लोकमत’च्या माध्यमातून राज्यभर चर्चेत आली. तुषारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. या फोपसंडी गावात जीओ या खासगी कंपनीचे मोबाईल नेटवर्क दोन दिवसांपूर्वी आल्याने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा होत आहे.
अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील फोपसंडी या गावातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाची दशा तुषार मुठेने ‘लोकमत’च्या माध्यमातून पुढे आणली. राज्यभर हा विषय इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरही चर्चिला गेला. फोपसंडी हे गाव जुन्नर व अकोलेच्या हद्दीवर आहे. गेल्या आठ दिवसांपासून फोपसंडीला नेटवर्क मिळणार कसे? हा चर्चेचा विषय होता.
अकोलेतील आमदार, खासदार तसेच विधानसभेला गुडघ्याला बाशिंग बांधलेले नेतेही इकडे फिरकलेच नाहीत. खासदार डाॅ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेणके, जिल्हा परिषद सदस्य अंकुशराव आमले यांनी गावात रेंज आणली. डाॅ. कोल्हे यांनी फोपसंडीशेजारीच असलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे हे गाव दत्तक घेतले आहे. याही गावात मोबाईल नेटवर्क नव्हते.
दोन्ही गावांसह आसपासच्या मांडवे, मुथाळणे, जांभूळशी या गावात कोपरे येथून जीओ कंपनीचे नेटवर्क सुरू केले. या नेटवर्क परिक्षेत्रात फोपसंडीही आल्याने आता फोपसंडी नेटवर्क व्हिलेज झाले आहे. यासाठी पंचायत समिती सदस्य विशाल तांबे, विजय कोल्हे, तुषार डोके यांनी प्रयत्न केले. फोपसंडी येथील दत्तू मुठे, चिमाजी उंबरे, बुधाजी नाडेकर यांनी आभार मानले.
...................
अकोलेतील नेते करतात काय?
फोपसंडीचा नेटवर्क विषय गाजत असताना अकोलेतील आमदार, खासदार किंवा कोणत्याही पक्षाचा नेता इकडे फिरकलाच नाही. शेजारच्या जुन्नर तालुक्यातील विविध पक्षांचे लोक एकत्र येऊन अकोलेतील प्रश्न सोडवतात, मग अकोले तालुक्यातील नेते नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित होतो.