नानासाहेब जठारविसापूर : चांभुर्डी (ता. श्रीगोंदा) येथील समाजसेवक विजय बोºहाडे कावडीने पाणी घालून सव्वाशे झाडांची आमराई जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या भीषण दुष्काळी स्थितीतही या समाजसेवकाने पाण्याचे योग्य नियोजन करून आंब्याची झाडे जगविली आहेत.बोºहाडे हे मुळचे पुणे शहरातील रहिवासी होते. मात्र त्यांनी लहानपणी समाजसेवेचा ध्यास घेतला. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर कोणतीही नोकरी न करता सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी विवाह केला नाही. त्यांनी घरदार सोडून कश्यप सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काही देणगीदारांची मदत घेऊन पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळा खोल्या श्रमदान व लोकसहभागातून बांधून दिल्या आहेत. चांभुर्डी येथे सामाजिक काम सुरू करण्याचा आग्रह त्यांच्याशी पुणे येथे त्यांच्या संपर्कात आलेल्या येथील काही ग्रामस्थांनी केला. त्यानंतर बोºहाडे यांनी चांभुर्डी येथे विसापूररोड लगत पाच एकर जमीन खरेदी केली. या ठिकाणी अनाथालय सुरू करण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र शासनाच्या जाचक अटी व स्थानिकांकडून अपेक्षित सहकार्य मिळविण्यात त्यांना यश आले नाही. यासाठी त्यांनी पाच खोल्या बांधलेल्या आहेत. त्या ठिकाणी ते एकटेच रहातात. तेथे त्यांनी केशर जातीचे १२० आंब्याची झाडे लावली आहेत. त्यांनी तेथे बोअरवेल घेऊन त्यावर हातपंप बसवला आहे. हातपंपामुळे पाण्याचा मर्यादित उपसा होतो. एवढ्या भयंकर दुष्काळी परिस्थितीही त्या हातपंपाला पाणी आहे. सध्या ते हे पाणी कावडीच्या साह्याने आंब्याच्या झाडांना घालत आहेत. पाणी टंचाई असल्याने गावातील लोकही या हातपंपाचे पाणी प्यायला घेऊन जातात.‘बोअरवेल’मध्ये विद्युत पंपाने पाण्याचा उपसा केल्यास पाण्याची पातळी खोलवर जाते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. हातपंपामुळे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करता येतो. या आंबा बागेत जी फळे येतील त्यांची विक्री न करता बागेत येऊन विसावा घेणारांना ही फळे विना मोबदला येथेच खाता येतील. मात्र बरोबर घेऊन जाता येणार नाहीत.-विजय बोºहाडे, समाजसेवक, चांभुर्डी, ता. श्रीगोंदा