अहमदनगर - महावितरणकडून लॉकडाऊन काळात१ एप्रिल २०२० पासून २० टक्के वीज दरवाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रत महागडी वीज जनतेला मिळत आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून पुन्हा वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. ही प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करावी, अशी मागणी करीत सोमवारी आम आदमी पार्टीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले व दरवाढ रद्द करण्याबाबत निवेदन दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हंटले आहे, शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला ३०० युनिट घरगुती वीज वापरात ३०% सवलत देण्याचे वचन दिले होते. तसेच बीजेपीकडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागच्या दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलने केली आहेत. दुसरीकडे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही कमी दरात वीज पुरवठा शक्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, राष्ट्रीय परिषद सदस्य किरण उपकारे तसेच हनीफ बागवान, कृष्णा पांचाळ, शुभम गांधी आदी उपस्थित होते.