कर्जत : माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर यांचे बंधू आबानाना निंबाळकर यांनी दिघी (ता. कर्जत) येथील बैठकीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात ते सक्रियही झाले आहेत.कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिंदे यांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं, रासपच्या पदाधिका-यांनी दिघी परिसरात ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, सचिन पोटरे, दादासाहेब सोनमाळी, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे आदी प्रमुख उपस्थित होते.खेडकर म्हणाले, पालकमंत्र्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. त्यांनी सर्वच जिल्हा परिषद गटात चांगला संपर्कही ठेवला आहे. त्यामुळे मतदार आपल्याबरोबरच राहतील. विरोधकांकडून मतदारसंघात जातीचे विष कालविण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्याला जनता थारा देणार नाही. यावेळी धांडेवाडीचे सरपंच काकासाहेब धांडे, कोरेगावचे सरपंच बापूराव शेळके, महासंग्राम युवा मोर्चाचे अध्यक्ष भारत मासाळ, बाजार समितीचे संचालक औदुंबरराजे निंबाळकर, बजरंग कदम, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, शहराध्यक्ष सागर कांबळे, भानुदास हाके, विशाल काकडे आदी उपस्थित होते.
आबासाहेब निंबाळकर यांचे बंधू भाजपमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 3:49 PM