कर्जत : प्रथम नगराध्यक्ष व भाजपचे नेते नामदेव राऊत यांच्या अभीष्टचिंतनासाठी कार्यकर्त्यांनी तब्बल चार लाखांच्या पुस्तक भेटीचा वर्षाव राऊत यांच्यावर केला. या पुस्तकरूपी शुभेच्छांची तालुक्यात मोठी चर्चा आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हितचिंतकांनी शाल, फेटे, श्रीफळ, बुके न आणता फक्त पुस्तके भेट द्यावीत, असे आवाहन राऊत यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत राऊत यांना सुमारे चार लाख रुपयांची अडीच हजार पुस्तके भेट रूपाने मिळाली आहेत. ही पुस्तके कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये तसेच वाचनालये, स्पर्धा परीक्षा केंद्र यांना मोफत वितरित करण्यात आली. राऊत यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बुके, शाल, श्रीफळ, फेटे हे स्वीकारले असते तर हा खर्च वायफळ झाला असता. अडीच हजार पुस्तके गरजूंना वाचण्यासाठी उपलब्ध झाली, याचे समाधान वाटते, असे राऊत यांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महासंग्राम युवा मंचचे तालुकाध्यक्ष भारत मासाळ, शहराध्यक्ष अमृत काळदाते, नगरसेवक अक्षय राऊत, रामदास हजारे, अनिल गदादे, अनिल भोज, विनोद दळवी आदींनी परिश्रम घेतले.