शिर्डी : साईबाबा प्रसादालयासमोरील पार्किंगमध्ये झोळीत झोपलेल्या ५ महिन्याच्या बालकाचे एका तरुणाने अपहरण केले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी या बालकास झोळीतून काढून अज्ञात तरुणाने लंपास केल्याने खळबळ माजली आहे. बालकाच्या शोधासाठी चार पथके रवाना केली आहेत.मध्यप्रदेशातील एक महिला शिर्डीमध्ये साईबाबांचे फोटो, लॉकेट विक्री करून उदरनिर्वाह करते. नेहमीप्रमाणे बाळास पार्किंगमधील झोळीत ठेवून ती मंदिर परिसरात गेली होती. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झोळीत बाळाला झोपवले आणि ती विक्री करण्यासाठी मंदिर परिसरात करण्यासाठी गेली. दहा वर्षाची मुलगी या बाळाजवळ होती. एका अज्ञात तरुणाने बाळास झोळीतून काढून पळ काढला. याबाबत शिर्डी पोलिसांत महिलेने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी शिर्डी बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह इतर ठिकाणी पाहणी केली. मात्र तरुण आढळून आला नाही. अधिक तपासासाठी विविध ठिकाणी चार पथके रवाना करण्यात आली आहेत. श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी घटनास्थळी जाून पाहणी केली. बाळाचे अपहरण झाल्याने आईने एकच टाहो फोडला आहे.
साई प्रसादालयातून बाळाचे अपहरण; चोरटा सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:22 PM