नेवासा : तालुक्यातील प्रवरासंगम येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी सकाळी महादेवाच्या नंदीला दुधाचा अभिषेक घालून अभिनव आंदोलन करण्यात आले.
दुधाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास कोरडे व कृषीतज्ञ डॉ. अशोक ढगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सर्व दूध संकलन केंद्र उत्स्फूर्तपणे बंद करून केंद्र संचालक या आंदोलनात सहभागी झाले.
या प्रसंगी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दौलतराव गणगे तालुकाध्यक्ष दादासाहेब नाबदे, हरिभाऊ देवरे, बापूसाहेब डावखर, संतोष डावखर व जगन्नाथ कोरडे यांच्यासह अनेक पशुपालक व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. डॉ. ढगे यांनी केंद्र सरकारच्या दूध पावडर आयात करण्याच्या धोरणाचा तीव्र निषेध केला.
अंबादास कोरडे यांनी पशुखाद्याचे भाव वाढले, जनावरांची औषधे व आरोग्य सेवा महाग झाली तथापि दुधाला त्या प्रमाणात वाढीव भाव मिळत नाही. शेतकºयांना थेट प्रतिलिटर दहा रुपये प्रमाणे अनुदान द्यावे व गाईच्या दुधाला प्रतिलिटर तीस रुपये ये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा. आज सर्व दूध उत्पादक शेतकºयांमध्ये असंतोष आहे. आंदोलनाचा उद्रेक टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन यांनी निर्णय घ्यावेत. तसेच दूध पावडर आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने तातडीने रद्द करावा. अन्यथा मोठे एल्गार आंदोलन नेवासा तालुक्यात करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.