पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगावसह कारवाडी, पूनतगाव, इमामपूर, गोणेगाव, निंभारी, अंमळनेर आदी भागात बुधवारी पावणे सातच्या दरम्यान वादळी वा-यासह आलेल्या पावसाने शेतक-यांची दाणादाण उडवली. विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह सुमारे तासभर पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. पाचेगासह कारवाडी भागात शेतक-यांनी शेतात सोंगलेला शेतमाल आणि काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा आदी पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. गव्हाची हार्वेस्टिंग करण्याची कामे सुरू होती. बुधवारी अचानक आकाशात वादळासह ढग दाटले आणि होत्याचे नव्हते झाले असे शेतकºयांनी सांगितले. कारवाडी भागात टोमॅटो पिकाचेही नुकसान झाले. शेतात काढलेला कांदा भिजला. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजवाहक तारा तुटल्याने परिसरात काही काळ वीज गूल झाली होती. बुधवारी झालेल्या पावसाची पाचेगाव येथील जलमापकावर ३८ मिलिमीटर नोंद झाली. महसूल प्रशासनाने पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
पाचेगावात तब्बल दीड इंच पाऊस; गहू, हरभरा, कांदा पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 5:00 PM