शेवगाव : एकाच पाणी योजनेद्वारे शेवगाव व पाथर्डी या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा होतो. यात पाथर्डीला मुबलक पाणी मिळते मग शेवगावच्या हिस्स्याचे पाणी जाते कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे. शेवगाव शहरात दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणी सुटते. तेही अवघे ३० ते ३५ मिनिटेच मिळते. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने नगरपरिषद प्रशासनाविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
शेवगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर जायकवाडी जलाशय आहे. तेथूनच पाणी योजना आहे. मात्र तरीही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. पाण्यासाठी नागरिकांना अनेक वर्षांपासून करावी लागणारी वणवण, भटकंती नित्याचीच झाली आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे पाणी प्रश्न खितपत पडला आहे, असे काहींचे म्हणणे आहे. येथील काही मंगल कार्यालय, हॉटेल तसेच वजनदार लोकांच्या घरातील नळाचे पाणी व प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरून सर्वसामान्यांना मिळणारे पाणी यातील तफावत बरेच काही सांगून जाते. पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या हातात पाणीपुरवठा नियोजनाबाबतचे राजकारण केंद्रित झाले आहे. अशा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही मंडळी सामान्यांमधील स्वतःचे महत्त्व वाढवत आहेत. प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नसल्याने बेबंदशाही सुरू आहे. पाथर्डीत पालिका प्रशासन योग्य नियाेजन करून जास्तीत जास्त नागरिकांना योग्यरितीने पाणी मिळवून देत असल्याचे दिसते. या उलट शेवगावमध्ये पाणी नियोजन दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
--------------
अन् ३५० हून अधिक नळजाेड झाले अधिकृत
शहरात अनधिकृत नळजोडणीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासक देवदत्त केकाण यांनी गुन्हे दाखल करणार असल्याचे जाहीर करताच ३५० हून अधिक नळजोड अधिकृत झाले आहेत. विशेष बाब म्हणजे काहींनी तर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दोन-तीन इंचापर्यंत पाईप लाईन टाकून बाग फुलविल्याची कुजबूज नागरिकांमध्ये आहे.
-----------
एकाच योजनेतून दोन्ही शहरांना पाणीपुरवठा होतो. पाथर्डीला सकाळी सरासरी ८ ते १० वाजेपर्यंत २७ ते २८ लाख लीटर पाणीपुरवठा होतो. तर शेवगावला २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो. त्यातून सरासरी ३८ ते ४० लाख लीटर नियमित पाणी दिले जाते. खंडित वीजपुरवठा तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास यात बदल होतो.
-राहुल देशमुख,
पाणीपुरवठा, ठेकेदार.
------------
तुलनात्मक आकडेवारी.
पाथर्डी :
प्रभाग ८, नगरसेवक संख्या १७.
सुमारे लोकसंख्या ३५ ते ३८ हजार.
रोज मिळणारे पाणी : २७ ते २८ लाख लीटर.
नळ कनेक्शन : ५००० पुढे.
वाॅल : २१२
पाणी सोडणारे कर्मचारी : ६
तीन टाक्यांची साठवण क्षमता : १८.७५ लाख लीटर.
दोन दिवसांनी ४० ते ४५ मिनिटे पाणीपुरवठा होतो.
------
शेवगाव :
प्रभाग २१, नगरसेवक संख्या २१
लोकसंख्या : ५० ते ५२ हजार.
रोज मिळणारे पाणी : ३८ ते ४० लाख लीटर.
नळ कनेक्शन : ७ हजार ४३३.
वाॅल : ३१२
पाणी सोडणारे कर्मचारी : ११
दोन टाक्यांची साठवण क्षमता : १७.५० लाख लीटर.
दहा ते बारा दिवसांनी ३० ते ३५ मिनिटे पाणीपुरवठा