कोपरगाव (जि. अहमदनगर ) : तालुक्यातील एका ३३ वर्षीय तक्रारदाराचे वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे (वय ४४) यांनी आपला पंटर गुरमीतसिंग दडियाल यांच्यामार्फत २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केली. त्यावर ती रक्कम स्विकारताना नाशिक लाचलुचपत पथकाने सापळा रचून गुरमीत दडीयाल यास रंगेहात पकडले आहे. हि कारवाई शुक्रवारी (दि. १९) रात्री उशिरा कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तहसीलदार विजय जबाजी बोरुडे (वय ४४, रा. शासकीय निवासस्थान कोपरगाव जिल्हा अहमदनगर.) व गुरमीतसिंग दडियाल ( वय ४० वर्ष. खाजगी इसम, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर ) यांचे विरुद्ध पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, सह सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक वैशाली पाटील, पो. ह. पंकज पळशीकर , पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रवीण महाजन, पो. ना प्रभाकर गवळी, चालक पो. ना. संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे.