लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय ४६) याला सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दातीर हे आपल्या घरी परतत असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी दातीर यांचे अपहरण करून ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला ऊर्फ विक्रम अर्जुन माळी (वय २५) व तोफिक मुक्तार शेख (वय २१) या दोन आरोपींना अटक केली होती. नंतर हा तपास डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. मिटके यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे (वय ४६) यास नेवासा फाटा परिसरातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले होते. मोरे याला सोमवारी न्यायालयात हजर केले. त्यास १० दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. शिंपी यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. आरोपीच्या बाजूने ॲड. तोडमल व सांगळे यांनी काम पाहिले.