कोपरगाव (जि. अहमदनगर) : शिर्डी येथील सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहात होता. त्यास शनिवारी रात्री दोनच्या सुमारास रुग्णालयात नेताना पोलीसाच्या दुचाकीवरून त्याने उडी टाकून पळ काढला. त्याच्या शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
घटनेबाबत माहिती अशी की, शिर्डी येथील सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी योगेश उर्फ गोट्या सर्जेराव पारधे (रा. कोल्हार खु., ता. राहूरी, जि. अहमदनगर) याला कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहात ठेवण्यात आलेले होते. शनिवारी रात्री एकच्या सुमारास रक्ताची उलटी झाली. त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रात्री सव्वादोनच्या सुमारास पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे हे दुचाकीवरून ग्रामीण रूग्णालयात नेत हाेते. वाबळे हॉस्पिटल जवळील वळणार त्यांच्या दुचाकीचा वेग कमी झाला. त्याचा फायदा घेऊन योगेश पारधे याने दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत पसार झाला. यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी त्याला पकडण्याचे प्रयत्न केले, परंतु अंधाराचा फायदा घेत तो फरार झाला.
पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली. त्यानंतर शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, पोलिस उप निरीक्षक रोहीदास ठोंबरे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून परिसर पिंजून काढला. मात्र योगेश पारधे सापडला नाही.
पो.हे.कॉ. पिनू बाबुराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून वरून आरोपी योगेश उर्फ सर्जेराव पारधे याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथके रवानाशिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने व पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपीला बेड्या ठोकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहे.