कोपरगाव : शहरातून अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले आहे, तसेच अल्पवयीन मुलीसही तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
शहरातील एका रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि. १५ फेब्रुवारीला) रात्री ७ : ३० वाजताच्या सुमारास लघुशंकेस जाऊन येते, असे सांगत गायब झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पालकाच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजू पोपट पगारे ( रा. तळवाडे, ता.येवला, जि.नाशिक ) यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा केला होता.
या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे, सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे, पोलीस हवालदार दिलीप तिकोणे, राजू पुंड, सुरज अग्रवाल, संभाजी शिंदे, रामकृष्ण खारतोडे, किशोर कुळधर, प्रकाश कुंढारे, महिला पोलीस हवालदार मंजुश्री त्रिभुवन यांची दोन वेगवेगळे पथक तयार करून घटनास्थळावर जावून बारकाईने चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी (दि.१६) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास आरोपी राजू पगारे याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे चौकशी केली असता, मुलगी त्याच्याच शेतातील घरात असल्याची त्याने कबुली दिली. त्यावर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. दरम्यान, आरोपीस बुधवारी (दि.१७) कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यास २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.