संगमनेर/तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात १९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा गळा दाबून खून करीत तिच्या अंगावरील दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
संगमनेर तालुका पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब उर्फ भावड्या झुंबर येलमामे ( वय ३० वर्षे रा. मिरपूर टा. संगमनेर ) व अश्विनी दत्तात्रय पंडीत ( रा. फत्तेबाद ता. श्रीरामपूर ) या दोघांना अकनी ( ता. मंठा जि. जालना ) या ठिकाणाहून ताब्यात घेत गजाआड केले. कौठेकमळेश्वर गावात सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेचा दि. १९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास घरात एकटीच असताना अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने तिच्या घरात प्रवेश करून गळा दाबून खून केला होता. तिच्या अंगावरील ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची मण्याची २० ग्रँम वजनाची तीन पदरी माळ, ६ हजार रुपये किंमतीची ४ ग्रँम वजनाची सोन्याची नथ, १ हजार पाचशे रुपये किंमतीचे १ ग्रँम वजनाचे कानातील कर्णफुल जोड व पाच वर्षे वयाच्या लहान मुलीच्या कानातील १ हजार ५०० रुपये किंमतीच्या १ ग्रँम वजनाच्या कानातील सोन्याच्या बाळ्या जोड लंपास केले. या घटने प्रकरणी सनी भगवान गायकवाड ( रा. अंभोरे ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.