केडगाव : पीक विमा मिळवून देतो असे सांगून बनावट पावत्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार आरोपीस नगर तालुका पोलिसांनी अटक केली.
हा गुन्हा दोन वर्षांपूर्वी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपी दीपक शिवाजी गायकवाड (वय २७, रा. निमगाव वाघा, ता.नगर) हा फरार होता. आरोपी हा त्यावेळी महा ई सेवा केंद्र चालवत असे. त्याचा फायदा घेऊन पीकविम्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन फसवणूक केली होती व फरार झाला होता. आरोपी लॉकडाऊनमध्ये घरी आल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक धनराज जारवाल यांनी ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून किती शेतकऱ्यांची फसवणूक केली त्याचा तपास सुरू आहे.