श्रीगोंदा : दौंड पोलिसांनी मोका लावलेला दरोड्यातील आरोपी १६ जुलै रोजी पहाटे येरवडा जेलमधून पळाला होता. त्यास श्रीगोंदा व पुणे पोलिसांनी सिनेस्टाईलने चार किलोमीटर पाठलाग करुन पकडले. ही घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात शुक्रवारी (२४ जुलै) पहाटे घडली.
देवगण आजिनाथ चव्हाण असे या अट्टल दरोडेखोराचे नाव आहे. त्यास चोरी, दरोड्याच्या दौंड (जि. पुणे) पोलिसांनी मोका लावला होता. तो येरवडा जेलमध्ये होता.
देवगण चव्हाण हा इतर चार आरोपीसह १६ जुलै रोजी पहाटे येरवडा कारागृहातून पळाले होते. यातील खतरनाक आरोपी देवगण चव्हाण याने केस, दाढी काढून टाकली. वेशांतर करून राक्षसवाडी शिवारातील लोहकरा नाला पुलाखाली लपून बसला होता.
आरोपी चव्हाण याचा सुगावा श्रीगोंदा पोलिसांना लागला होता. त्यास पकडण्यासाठी शुक्रवारी पहाटे पोलीस गेले असता त्याने तेथून धूम ठोकली. पोलिसांनी चार किलोमीटर पाठलाग करुन त्यास पकङले. श्रीगोंदा सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पो. हे. कॉ. अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, व पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाºयांनी ही कामगिरी बजावली.