अहमदनगर): वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे भर रस्त्यावर पेट्रोल ओतून प्राध्यापिकेला पेटवून दिल्याच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असताना बुधवारी महिलेवर अत्याचार करणाऱ्यास पिडीतेच्या संतप्त नातेवाईकांनी गावातील सिमेंटच्या बाकास बांधून बेदम मारहाण केल्याने तो ठार झाला. अहमदनगर जिल्ह्यातील शिरपुंजे (ता. अकोले) येथे ही घटना घडली.
राजू गणपत सोनवणे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. शिरपुंजे येथील पीडित महिला मंगळवारी जनावरे चारण्यासाठी शिवारात गेली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी राजू सोनवणे याने तिच्यावर अत्याचार केला व जंगलात पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी संध्याकाळी जंगलातून शोधून त्याला गावात आणले. सिमेंटच्या बाकड्यास बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो जबर जखमी झाला. त्यानंतर त्यास राजूर येथे आणले. तेथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.
शिरपुंजे येथील पोलीसपाटील रंगनाथ काळू धिंदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
सिल्लोडमध्ये पेटविलेल्या महिलेचा मृत्यू
दरम्यान, औरंगाबादमधील अंधारी (ता. सिल्लोड) येथील घरात घुसून रॉकेल टाकून पेटविलेल्या महिलेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) रात्री दहाच्या सुमारास मृत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. संगीता प्रभाकर कांबळे (४०)असे मृत महिलेचे नाव आहे.