अकोले विधानसभा निवडणूक विश्लेषण - हेमंत आवारी । अकोले : तालुक्यातील ४० वर्षांच्या पिचड घराण्याच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत व ‘तालुक्याचा विकास’ या मुद्याला ‘वॉश आऊट’ करत राष्ट्रवादीचे डॉ. किरण यमाजी लहामटे हे विधानसभेत पोहचले. भाजपचे वैभव पिचड यांचा ५७ हजार ६०५ इतक्या मतांनी पराभव करीत लहामटे ख-या अर्थाने ‘जायंट किलर’ ठरले. तालुक्याचे भगवेकरण होणे टळले आणि पुरोगामीत्व टिकून राहिले.पहिल्या फेरीत बाराशे मतांची आघाडी, तिस-या फेरीला साडेसात हजार तर चौदाव्या फेरीला ३४ हजार अशी आघाडी घेत अखेरच्या २२ व्या फेरीअखेर डॉ.लहामटे यांनी ५७ हजारांनी पिचड यांना पराभवाची धूळ चारली. सर्व भागातून त्यांना आघाडी मिळाली. पिचड यांचा बालेकिल्ला असणा-या राजूर भागात व प्रवरा खो-यातही लहामटे यांना मोठी आघाडी मिळाली. आदिवासी पट्टा, प्रवरा-आढळा- मुळा खोरे व पठार भागाने दिलेल्या अपेक्षित आघाडीने लहामटेंंनी गुलाल घेतला. डॉ.लहामटे यांना १ लाख १३ हजार २६७ मते मिळाली तर पिचड यांना अवघी ५५ हजार ६६२ मते मिळाली.तालुक्यात ४० वर्षांची सत्ता बदलली पण ‘घड्याळ’ मात्र पुन्हा विजयी झाले. तालुक्यातील शेतक-यांना भाजपचा विकास मान्य झाला नाही. जनतेला पिचडांचा पक्ष बदल मानवला नाही. जनता पुढाºयांमागे नाही. गावपुढारी एका बाजूला आणि जनता एका बाजूला असे ईव्हीएम यंत्रातून गावागावातील चित्र पुढे आले आहे.१९९५ ला माजी मंत्री पिचड यांना सोडून सर्व पुढारी त्यांच्या विरोधात गेले होते. तेव्हा पिचडांसाठी जनता धावून आली होती. यावेळी तालुक्यातील सर्व मातब्बर पुढारी पिचडांभोवती एकवटल्याने जनतेने निवडणूक हातात घेत डॉ.लहामटे यांना साथ दिली.अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या सभांनी निवडणुकीत जान आणली तर शरद पवार यांच्या सभेने आघाडीचा विजय निश्चित केला होता. मुख्यमंत्र्यांची सभा पिचडांना विजयी करु शकली नाही. भरपावसात आघाडीच्या तरुणाईने विजयाचा जल्लोष साजरा केला. विकासासाठी पक्ष बदल अकोलेकरांना रुचला नाही. ४० वर्षांनी विरोधकांनी प्रथमच गुलाल घेतला. जनतेने निवडणूक हाती घेतली होतीजनतेनेच निवडणूक हाती घेतली होती. मी एकटा नाही तर अकोले मतदारसंघातील सर्व जनताच ‘आमदार’ झाली आहे. सर्व घटक पक्ष तसेच माकप-भाकप व सेना भाजपातील हितचिंतकांनी मदत केली. विरोधकांचा लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न फसला. जनतेचा आदेश आणि त्यांचा विकास हाच माझा अजेंडा आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गळ्यातील भगवी शाल कधीच बाजूला करणार नाही, असे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी सांगितले.
अकोलेत पिचडांच्या सत्तेला सुरूंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:39 PM