संगमनेर : संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलिस पथकाने कारवाई करत १७०० किलो गोमांस, दोन चारचाकी वाहने असा एकुण ९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोवंश जनावरांची कत्तल करत गोमांस दोन वाहनामध्ये भरले जात होते. त्या ठिकाणी गुरूवारी (दि.२०) पहाटे कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर पसार आहेत. आसिफ इकबाल कुरेशी (वय ३२, हल्ली रा. मदिनानगर, गल्ली क्रमांक ३, संगमनेर, मूळ रा. घर नंबर २७३ कुतुब हॉटेलजवळ, कमालपुरा, मालेगाव, जि. नाशिक), सोनू रफिक कुरेशी, सालीम साठम कुरेशी (दोघेही रा. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याविरुद्ध विशेष पोलिस पथकातील पोलिस कॉस्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर उपविभागाचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकातील पोलिस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉस्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव, प्रमोद गाडेकर यांनी ही कारवाई केली.