कर्जत : जुन्या वादातून सोमवारी सकाळी दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. यामध्ये नऊ जण जखमी झाले असून,आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बजरंगवाडी येथील रूपनर वस्तीवर घडला.भाऊसाहेब रावसाहेब गोयकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सावता बजंगे व इतरांनी माझे सासरे मच्छिंद्र श्रीपती रूपनर यांच्या वस्तीवर गैरमंडळी जमवून घरात शिरून तू पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद का दिली. तसेच जुन्या भांडणाचा राग धरून गज व काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या मारहाणीत भाऊसाहेब गोयकर, रावसाहेब गोयकर, सुधामती गोयकर, सुनील गलांडे, मच्छिंद्र रूपनर, अनिल रूपनर, सावता बजंगे, धूळदेव बजंगे, पंढरीनाथ बजंगे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास जी.एस. जांभळे हे करत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
जुन्या वादातून हाणामारी
By admin | Published: May 05, 2015 2:53 PM