श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : प्रवरा नदीपात्रात श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील हद्दीमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन चप्पू श्रीरामपूर येथील महसूल विभागाने धडक मोहिमेत नष्ट केल्या. कारवाई वेळी वाळू तस्कर मात्र पसार झाले. प्रवरा नदीपात्रात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. तरीही पाण्यातून वाळू वाहून नेणाऱ्या चप्पूचा तस्कर वापर करत होते.
महसूल पथकाने गुरुवारी संध्याकाळी अवैध वाळू उपसा वापरण्यात येणाऱ्या तीन चप्पू जेसीबीच्या मदतीने तोडफोड करून पूर्णपणे नष्ट केल्या. प्रवरा नदीकाठवरील कडीत (ता.श्रीरामपूर ) हद्दीतून एक, गुहा (ता.राहुरी) गावाच्या हद्दीलगत दोन चप्पू दोरीने वाळू तस्कारांनी बांधून ठेवल्या होत्या. तीनही चप्पू तोडून टाकून महसूल पथकाने नष्ट करून कारवाई केली.
अनेक दिवसांपासून कडीत येथे अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला होती. तालुक्यातील प्रवरा नदीकाठी श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील हद्दीत त्याची वाहतूक केली जात होती. विशेष म्हणजे तीनही चप्पू नदीपात्राकडेला वाळू तस्कारांनी कटावनात लपून ठेवले होते. त्यामुळे प्रशासनासमोर त्या काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. मात्र अट्टल पोहण्याच्या मदतीने नदीपात्रा बाहेर काढत तोडून टाकण्यात आल्या.
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी बी.के मंडलिक, उक्कलगावचे तलाठी इम्रानखान इमानदार, मांडवेचे तलाठी हिमालय डमाळे, शहाजी वडितके, संतोष पारखे, कडीतचे पोलिस पाटील कारभारी वडितके यांनी ही कारवाई केली. यावेळी रावसाहेब वडितके, भाऊसाहेब वडितके, कडीतचे पाडुरंग वडितके उपस्थित होते.