लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: भटके विमुक्त जमातीच्या समूहाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी लवकरच एक कृती आराखडा तयार करून राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार असल्याची घोषणा समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी केली.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अहमदनगर व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महा ज्योती) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भटके विमुक्त जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना व आश्रम शाळांच्या प्रतिनिधींच्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयच्या सभागृहात मंगळवारी आयोजित या कार्यशाळेस इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिकचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. भगवान वीर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधा किसन देवढे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या सदस्या आमिना शेख, भाऊसाहेब खरे, भटके विमुक्त जमाती राज्यस्तरीय कल्याण समितीच्या सदस्य मुमताज शेख, भटके विमुक्त जमाती, जिल्हास्तरीय कल्याण समितीचे सदस्य ॲड. डॉ. अरुण जाधव, बाबासाहेब भोईटे आदी विचारपिठावर उपस्थित होते.
माधव वाघ पुढे म्हणाले या कार्यशाळेच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यात एक चांगली सुरुवात झाली आहे. भटक्या विमुक्त समूहाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी आणि माझे सर्व अधिकारी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहेत. यासाठी करावयाच्या प्रत्यक्ष कामाचा कृती आराखडा तयार करून राज्यस्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. यात आपणा सर्वानाच समतेचे दुत म्हणून कार्य करायचे आहे.भगवान वीर म्हणाले की, एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के लोकसंख्या असलेल्या भटके विमुक्त समूहातील लोकांना त्यांच्यासाठी असलेल्या सर्व योजना त्यांच्या पर्यंत पोहचवायच्या आहेत त्यासाठी त्यांना जातीचे दाखले, रेशनकार्ड व घरकुल योजना या ३ मुद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याच बरोबर भटके विमुक्त समूहातील १४ वर्षा खालील एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठीही विशेष उपक्रम व उपाययोजना हाती घेतली जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"