राशीन : कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील भीमा नदीपात्रात यांत्रिक बोटींच्या सहाय्याने सुरू असलेल्या वाळू उपशावर कर्जत पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तीन यांत्रिक बोटी व सेक्शन फायबर असा २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यास जलसमाधी देण्यात आली.
भीमा नदीपात्रात भरत बलभीम अमनर, दत्तात्रय विक्रम खताळ, अंकुश बाप्पू ठोंबरे हे अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना समजली होती. यादव यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांना संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर भगवान शिरसाठ व सोबत असलेल्या पोलीस यंत्रणेने येथे छापा टाकला. तेथे तीन यांत्रिक बोटी सेक्शन फायबरच्या सहाय्याने वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले. त्या तीनही बोटी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी असलेल्या दोन परप्रांतियांनाही ताब्यात घेतले. बोटींच्या मालकाबाबत विचारपूस केली असता भरत बलभीम अमनर, शरद शेंडगे (दोघेही रा. वाटलूज, ता. दौंड), दत्तात्रय विक्रम खताळ, अंकुश ठोंबरे (दोघेही रा. गणेशवाडी, ता. कर्जत) अशी त्यांची नावे सांगण्यात आली. भा. दं. वि. कलम ३७९, ३४ व पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीराम सातपुते, मारुती काळे, सुनील खैरे, सागर म्हेत्रे, मनोज लातूरकर, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे आदींनी केली आहे.
---
२७ राशीन
कर्जत तालुक्यातील भीमा नदीपात्रात पोलीस कारवाईवेळी आढळलेल्या बोटी.