अहमदनगर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील दुस-या टप्प्याच्या कारवाईत आणखी पाच मंदिरे हटविण्यात आली. गुरुवारी रात्री ११.३० वाजता कारवाईला सुरूवात होऊन पहाटेपर्यंत कारवाई करण्यात आली.
रस्त्याला अडथळा ठरणा-या तसेच फुटपाथवरील १९६० नंतरच्या ६८ धार्मिक स्थळांवर महापालिका प्रशासनाने गुरुवारी पहाटे कारवाईला सुरूवात केली. यामध्ये कल्याण रस्त्यावरील दोन मंदिरांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर रात्री पुन्हा सहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त राजेंद्र चव्हाण, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे आदींसह नगररचना विभागाचे अभियंता कल्याण बल्लाळ, प्रभाग अधिका-यांच्या उपस्थितीत कर्मचा-यांच्या पथकाने कल्याण रोडवरील अर्धवट पाडलेले बांधकाम जमीनदोस्त करून कारवाईला सुरूवात केली.
रात्री बारानंतर बालिकाश्रम रस्त्यावरील शितळादेवी मंदीर, ओबेरॉय हॉटेल शेजारील हनुमान मंदिर, हुंडेकरी शोरुमसमोरील लक्ष्मीआई मंदिर, भिस्तबाग चौकातील म्हसोबा मंदिर व प्रोफेसर कॉलनीतील शिवमंदीर अशी पाच मंदिरे हटविण्यात आली. मनपाच्या पथकातील विद्युत विभागाच्या कर्मचा-यांनी मोहिमेकडे पाठ फिरविली. त्यामुळे उपस्थित असलेल्या इतर कर्मचा-यांनाच जीव धोक्यात घालून विद्युत तारांची, पुरवठा खंडीत करण्याची कामे करावी लागली. यावेळी दंगल नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कारवाई शांततेत पार पडली.