अहमदनगर: अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि. २६) सायंकाळी शहरातील जीपीऔ चौकातील छावणी कॉम्प्लेक्समधील एका दुकानात बेकायदेशीर साठवून ठेवलेला डिझेलचा साठा जप्त केला आहे.
यावेळी एक टँकर व ट्रकसह एकूण साडेतेरा लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला़ या कारवाईबाबत मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
विशेष पथकाने डिझेलचा काळाबाजार करणारा आरोपी गौतम वसंत बेळगे (वय ३८ रा़भगवानबाबा चौक, भिंगार) याला अटक केली आहे. घटनास्थळी पथकाला बेळगे हा टँकरमधून ट्रकमध्ये डिझेलभरताना आढळून आला़ त्याच्याकडून १ हजार ९३७ लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे.
कारवाईत जप्त केलेले हे डिझेल बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. या डिझेलचे नमुने नाशिक येथील रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी प्रविण पाटील यांनी सांगितले. आरोपीविरोधात पोलीस नाईक अरविंद रमेश भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीवनावश्यक वस्तू कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान विशेष पथकाने जीपीऔ चौकात सोमवारी दुपारी कारवाई केली. याबाबत मात्र भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला.
आता याबाबत गुन्हा दाखल होण्यास इतका विलंब का झाला असाही प्रश्न उपस्थित होत आहे़ दरम्यान केलेली ही कारवाई योग्य होती की नाही, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी श्रीरामपूर येथील पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नगरमध्ये बनावट डिझेलचे मोठे रॅकेट डिझेलमध्ये केवळ २० टक्के मिश्रण म्हणून वापरण्याची परवानगी असलेल्या बायोडिझेल विक्रीचे जिल्ह्यात मोठे रॅकेट आहे़ भिंगारमध्ये पकडलेले डिझेल हे बायोडिझेल असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ आता प्रयोगशाळेतील अहवालानंतरच हे डिझेल कोणते आहे हे समोर येईल़