अहमदनगर: पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा वाळूतस्करांवर एमपीडीएतंर्गत कारवाई केली आहे़ आदेश निघताच या तिघांना पोलिसांनी स्थानबद्ध करत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़ महेंद्र बाजीराव महारनोर (वय २६ रा़ डोमाळवाडी ता़ श्रीगोंदा), अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील (वय २० रा़ गांधीनगर कोपरगाव) व सुदाम उर्फ दीपक भास्कर खामकर(वय २८ रा़ मांडवे खुर्द ता़ पारनेर) या तिघांवर ही कारवाई करण्यात आली आहे़ महारनोर याच्यावर श्रीगोंदा, शिरुर या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, अजय पाटील याच्याविरोधात कोपरगाव तर खामकर याच्याविरोधात पारनेर व घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत़ या तिघांविरोधात एमपीडीएतंर्गत कोपरगाव, घारगाव व श्रीगोंदा पोलीस ठाण्यामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला होता़ जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, दीपाली कांबळे, उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, रोशन पंडित, संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, दौलतराव जाधव, अंबादास भुसारे, राकेश मानगावकर, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉन्स्टेबल किरण जाधव, सुरज वाबळे, रोहित मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली़
तिघा वाळू तस्करांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 3:50 PM