लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : रयत शिक्षण संस्थेत नियम डावलून काही कामे करण्यात आलेली आहेत. ही बाब संस्थेने गांभीर्याने घेतली असून, याबाबत लवकरच कारवाई केली जाईल, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी येथे सांगितले.
नगर येथील रयतच्या उत्तर विभागीय कार्यालयात सोमवारी झालेल्या कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचा कारभार स्वच्छ आहे. त्यामुळे या संस्थेत काहीही झाले तरी लगेच लक्षात येते. संस्थेत झालेल्या गैरप्रकाराबाबत स्वत: शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कारून योग्य ती कारवाई होईल.
आघाडी सरकार तीन महिन्यांत पलटी होईल, अशी टीका विरोधकांनी केली हाेती. मात्र हे सरकार १४ महिने टिकले. आणि पुढील पाच वर्षे जनतेच्या हिताची कामे करत राहिल, असे पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला उत्तर देताना सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ठाकरे सरकारावर केलेल्या आरोपाकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, महाराष्ट्रात जनतेच्या हितासाठी तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आले. त्यामुळे एक वेगळे समीकरण राज्यात पाहायला मिळाले.
....
स्थानिक विकासासाठी राळेभात राष्ट्रवादीसोबत
जिल्हा बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज राष्ट्रवादीचे सुरेश भोसले यांनी मागे घेतल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता पवार म्हणाले, जामखेड तालुक्याच्या विकासासाठी जगन्नाथ राळेभात हे राष्ट्रवादीसोबत आहेत. ज्यावेळी स्थानिक निवडणुका होतील, त्यावेळी राळेभात हे आमच्या सोबत असतील, असा विश्वास आहे.