अकोले विधानसभा - हेमंत आवारी । अकोले तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘भांगरे-पिचड’ घराण्यातील संघर्ष १९७७-७८ पासून सुरु आहे. १९५२ पासून यावेळी प्रथमच शेंडीच्या भांगरे घराण्यातील कोणीही निवडणूक रिंगणात नाही. आमदार वैभव पिचड यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला. त्यामुळे पाच वर्षे विधानसभेसाठी मशागत करणाºयांची पंचायत झाली आणि त्यांनाही पक्ष बदलावा लागला. ‘मसाला तोच मात्र लेबल बदलून’ असे चित्र मतदारसंघात आहे. वंचितने दिलेल्या उमेदवारीचा परिणाम शून्य जाणवत असल्याने यंदाची ‘पिचड-लहामटे’ ही दुरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे.लाल बावटा व पुरोगामी चळवळीचा बालेकिल्ला अशी तालुक्याची पूर्वी ओळख होती. त्याचे भगवेकरण होण्यास सुरुवात झाली. अनेक वेळा पिचड विरोधक विजयाच्या समीप गेले पण मतविभाजनाचा फायदा पिचड यांनाच मिळत गेला. यावेळी ‘एकास एक’ लढत आहे. कॉंग्रेसी विचारधारेतून आलेले पिचड यावेळी भाजपत गेले. १९७७-७८ ला पहिला पराभव पचवल्यानंतर १९८० ते २००९ पर्यंत मधुकर पिचड यांनी सातवेळा निवडून येत तालुक्याची धुरा संभाळली. २०१४ ला राष्ट्रवादीकडून वैभव पिचड आमदार झाले. पिचडांनी भाजपत प्रवेश केल्याने सर्व विरोधकांनी एकत्र येऊन डॉ. लहामटे यांच्या पाठिशी ताकद उभी केली आहे. पिचडांचे पक्षांतर व विरोधकांची एकी या दोन्ही बाबी प्रथमच घडत आहे. यात कोणाची सरशी होणार हे या निवडणुकीत ठरेल. गेली चाळीस वर्षातील सात पंचवार्षिकमधून माजी मंत्री पिचड यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे, आ.पिचड यांचा गत पाच वर्षाचा विधानसभेतील अनुभव, भाजपात प्रवेश करताच वीज उपकेंद्रांना मिळालेली मंजुरी, कोल्हार घोटी राज्य मार्गासाठी युती सरकारने दिलेला १६८ कोटींचा निधी, अगस्ती कारखाना व अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून शेतक-यांचा केलेला विकास, पर्यटन विकासाची झालेली कामे या बाबी पिचड सभांमधून मांडत आहेत. साडेचार पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य या नात्याने लहामटे व भांगरे यांनी भरीव विकास कामे केली. पिचडांमुळे तालुक्याचा विकास रखडला हे लहामटे यांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत. शेतकरी नेते दशरथ सावंत, अशोक भांगरे, डॉ. अजित नवले, विनय सावंत या नेत्यांची लहामटे यांना साथ आहे. लहामटे यांना एक संधी देऊन पहा. तालुक्यात परिवर्तन घडेल अशीही मांडणी केली जात आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पठार भागात लहामटे यांच्यासाठी सक्रीय झाले आहेत.
दुरंगी लढतीमुळे अकोलेत चुरस; पिचडांचे पक्षांतर; विरोधकांचा एकास एक उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:01 PM