संगमनेर : सडेतोड भूमिकेसाठी ओळखल्या जाणा-या ठाकरे परिवारातील सदस्य असलेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे लग्नाचा विषय छेडताच सामान्य मुलाप्रमाणे लाजले. लग्नाचा विषय आईने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोपविला आहे, असे सांगत आदित्य यांनी वेळही मारून नेली. त्यांचा हा लाजराबुजरा भाव तरुणाईत भलताच भाव खाऊन गेला आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे चिरंजीव राजवर्धन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मेधा-२०२० युवा सांस्कृतिक महोत्सवात प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नांना मंत्री आदित्य हे उत्तर देत होते. संगमनेरातील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत संवाद तरुणाईशी हा कार्यक्रम पार पडला. राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार झिशान सिद्दीकी, आमदार धीरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील यावेळी उपस्थित होते. काहिशा मिश्किल व तितक्याच गमतीदार सोहळ्यातील प्रश्नोत्तराचे सत्र तरुणाईच्या टाळ्या व शिट्ट्यांनी रंगले. त्याला कारणही तसेच होते. राज्याच्या विधानसभेत प्रथमच पोहोचलेल्या या तरुण आमदारांची अवधूत गुप्ते यांनी काहीसे अडचणीचे प्रश्न विचारून चांगलीच फिरकी घेतली. त्या प्रश्नांना आमदारांनीही चांगलेच टोलावले.
मंत्री आदित्य यांना लग्नाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. आई मुलगा मोठा होईपर्यंत त्याची जबाबदारी घेते. मात्र रश्मी वहिनींनी आता ही जबाबदारी कुणावर सोपवावी? असा प्रश्न गायक गुप्ते यांनी छेडत आदित्य यांची अडचण केली. त्यावर हा विषय आई रश्मी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच सोपविला आहे. मी त्यावर काहीही बोलणार नाही. पुढचं अजून ठरलेलं नाही, असे सांगत आदित्य यांनी या प्रश्नावर बोलण्याचे टाळत आपली सुटका करून घेतली.