अकोले : राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा व तालुका तालीम संघ यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला अकोल्यात प्रारंभ झाला. स्पर्धेतून महाराष्ट्र केसरीसाठी माती व मॅट अशा दोन गटांतून खेळाडू निवडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, अशोक शिर्के, गुलाब बर्डे, सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू अंजली देवकर यांच्या उपस्थितीत अगस्तीऋषींच्या भूमीत या स्पर्धा होत आहेत. रविवारी सकाळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते व भाजपा नेते अशोक भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन झाले. बर्डे, शिर्के, अंजली देवकर या अस्सल हिऱ्यांनी महाराष्ट्र केसरी व सुवर्णपदक मिळवत नगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. आता अगस्तीच्या पावन भूमीतून आशीर्वाद घेऊन येथे खेळलेले मल्ल नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्पर्धेचा महाराष्ट्राचा कुस्ती आखाडा निश्चित गाजवतील, अशी आशा माजी खासदार वाकचौरे यांनी व्यक्त केली. दिवसभर येथील अगस्ती विद्यालयाच्या मैदानावर कुस्त्यांचा आखाडा नामांकित मल्लांनी गाजवला. महाराष्ट्र केसरीसाठी ही जिल्ह्याची निवड स्पर्धा असून १४ तालुक्यांतील जवळपास २५० मल्ल यात सहभाग झाले. मॅट आणि माती अशा दोन मैदानांवर या कुस्त्या खेळल्या गेल्या. ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७ व १२५ किलो वजनगटात अशा आठ गटांत या स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. तालीम संघाचे तालुकाध्यक्ष बबलू धुमाळ, स्वागताध्यक्ष शिवाजी धुमाळ, तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे, अॅड. वसंत मनकर, निलेश भांगरे, डॉ. रवी गोर्डे, उमेश बाळसराफ, चंदन वस्ताद, भोईर गुरुजी, दिलीप भांगरे, निखिल जगताप, सुधीर रावले, बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद मंडलिक आदींनी स्पर्धेचे नियोजन केले. (तालुका प्रतिनिधी)
अडिचशे मल्लांची हजेरी
By admin | Published: December 20, 2015 11:20 PM