राजूर : आदिवासी भागात आजही आजोबांच्या नावावर असलेली शेतजमीन नातू करीत आहे. सदर जमिनीचे खातेवाटप झालेले नसल्यामुळे अनेक आदिवासी शेतकरी विविध लाभांपासून वंचित राहात आहेत. त्यामुळे महसूल विभागाने सदर जमिनींची खातेवाटप करण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार वैभव पिचड यांनी केले. आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत आपद्ग्रस्त झालेल्या अंबित येथील आदिवासी लाभार्थींना आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत ताडपत्रींचे वितरण आमदार पिचड यांच्या हस्ते शिरपुंजे येथील आश्रमशाळेत करण्यात आले. त्या वेळी अंबित, कुमशेत, शिरपुंजे येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना आ़ पिचड बोलत होते. या वेळी तहसीलदार मनोज देशमुख, प्रकल्प अधिकारी ए. पी. अहिरे, सी. बी. भांगरे, माधव गभाले, दौलत देशमुख, कामगार तलाठी सुकन्या वैद्य, ग्रामसेवक रवींद्र पर्बत, मनोज सोनवणे, मुख्याध्यापक एच. एन. घुले आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार पिचड पुढे म्हणाले, यावर्षी दोन वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे अंबित येथे मोठ्या प्रमाणात डोंगराचे भूस्खलन झाले. प्रतिकूल परिस्थितीत ग्रामस्थांना आपत्तीचा सामना करावा लागला. शिरपुंजे येथील आश्रमशाळेत जनावरे, घरदार सोडून वास्तव्य केले. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी भेट देऊन आपद्ग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने मदत केली. अडचणीच्या काळात प्रशासनाने आपत्तीग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन आमदार पिचड यांनी केले. खातेवाटप व जातीच्या दाखल्यांसाठी महसूल विभागाने दीपावलीनंतर येथील मध्यवर्ती ठिकाणी शिबिर आयोजित करावीत, अशा सूचना तहसीलदार देशमुख यांना दिल्या. तहसीलदार देशमुख यांनी अतिवृष्टीकाळात पडझड झालेल्या घरांच्या पंचनाम्याची रक्कम लवकरच खातेदारांना देण्यात येईल, असे सांगितले़ शिरपुंजे येथील गंगाराम धिंदळे, कुमशेतचे सयाजी अस्वले या शेतकऱ्यांनी आपली कैफियत यावेळी मांडली. सरपंच उषा भारमल यांनी उपस्थितांचा सत्कार केला. डी. एस. बारामते व रियाज दुंगे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार डी. एस. जाधव यांनी मानले. (वार्ताहर)
आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींचे खातेवाटप करावे
By admin | Published: October 09, 2016 12:35 AM