अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील एका शिक्षकासह १९ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ज्या ४१० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली त्यांना घरी न सोडल्याने पालक चिंतेत आहेत. आम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेत असल्याने पालकांनी चिंता करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोनासारखी लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांची टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले. त्यानंतर शुक्रवारी काही विद्यार्थ्यांची तपासणी केली असता दहा विद्यार्थी व एक संगीत शिक्षक बाधित आढळून आले. त्यामुळे बाधित विद्यार्थी व शिक्षक यांना पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य विभागाने उपचारासाठी दाखल केले आहे.
नवोदय विद्यालयातील इतर ४१० विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांची चाचणी निगेटीव्ह आली. मात्र विद्यालयाने त्यांना शाळेतच ठेवले असून त्यांची काळजी घेण्यात येत आहे.
मात्र आपली मुले आपल्या घरी व आपल्या नजरेसमोर असावीत अशी पालकांची इच्छा आहे. त्यामुळे पालकही चिंतेत आहेत. याबाबत प्रशासनाने मात्र आम्ही विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेत असून पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. यामुळे एक प्रकारचा पेच निर्माण झाला आहे.
----- नवोदय विद्यालयातील उर्वरित विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. तसेच त्यांची व्यवस्थित काळजी घेता यावी म्हणून त्यांना नवोदय विद्यालयात ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर ही प्रशासनाचे लक्ष आहे. त्यामुळे पालकांनी चिंता करू नये. या मुलांना त्यांच्या घरी सोडल्यास समाजातही बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपया पालकांनी घाबरून जाऊ नये.- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी अहमदनगर