केडगाव : नगर तालुक्यातील पिंपळगाव तलावाचे पाणी आदिवासींच्या पालामध्ये घुसल्याने तेथील परिस्थिती बिकट बनलेली आहे. याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी, तसेच पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आदिवासी समाजाच्या पालांची पाहणी केली.
पिंपळगाव तलावातील आदिवासींच्या पालामध्ये तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाणी घुसलेले आहे. लहान चिमुरड्यांसह तेथील आदिवासी जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार उमेश पाटील, जेऊर मंडलाधिकारी वृषाली करोसिया, सावेडी मंडलाधिकारी अजय ढसाळ, तलाठी सुदर्शन साळवे यांनी भेट देऊन पाहणी केली. पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, सरपंच राधिका प्रभुणे, ग्रामसेवक शेळके यांनीही भेट देऊन पाहणी केली.
................
तलाव परिसरातील आदिवासी कुटुंबीयांचा जेऊर व पिंपळगाव तलाठ्यांच्या मार्फत सर्व्हे करण्यात येणार आहे. धान्य, रेशन कार्ड, जातीचे दाखले याबाबत येथे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. आदिवासींचे वास्तव्य अतिक्रमणात असून, तलावाचे क्षेत्र महानगरपालिकेच्या नावावर असल्याने याबाबत महानगरपालिका निर्णय घेईल.
- उमेश पाटील, तहसीलदार.
....................
शबरी आवास योजनेंतर्गत घरकूल
येथील आदिवासी कुटुंबीयांना जागा उपलब्ध करून, शबरी आवास योजनेंतर्गत घरकूल देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी दिल्या आहेत. तलाव परिसरात सुमारे २५० आदिवासी कुटुंब राहत असल्याचे सांगण्यात येते.